लग्न म्हणजे काय?

‘लग्न म्हणजे काय’ ह्या प्रश्नाबद्दल विचार करताना मला निर्माण व डॉ. अभय व राणी बंग ह्यांची आठवण झाली. त्यांचे हे आवडते प्रश्न: MK-KM, अर्थात ‘म्हणजे काय’ आणि ‘कसे मोजणार?’ कोणत्याही गोष्टीचे विश्लेषण करायला हे २ प्रश्न अनिवार्य आहेत. पण हे प्रश्न ‘लग्न’ अशा अनेक भावनांच्या व नात्यांच्या गुंतागुंतीने घडलेल्या गौडबंगालाला समजण्याकरिता पूरक ठरतील का, असा प्रश्न मला नंतर पडला. तरीही, मी स्वतःला हे २ प्रश्न विचारून बघितले.

मी स्वतःला एक ‘जाज्वल्य’ स्त्रीमुक्तिवादी मानते. खूप लोक विचारतात, स्त्रीमुक्तीवाद, अर्थात ‘नारवाद’ म्हणजे काय? (परत तोच प्रश्न!). एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर मी म्हणीन, नारीवाद ही अशी चळवळ आहे जी समाजातल्या स्त्री-पुरुषांमध्ये – अर्थात अशा कोणत्याही उच्च-नीच बाळगणाऱ्या सामाजिक गटांमध्ये – समानता आणण्याचा प्रयत्न करते. नारीवादाचा एक विशेष पैलू म्हणजे आपल्या समाजातल्या विविध व्यवस्था व प्रथांचा बारकाईने अभ्यास करून, त्यातल्या असमान किंवा पुरुषांना प्राधान्य देणाऱ्या घटकांवर एक समाविष्ट विकल्प प्रस्तुत करणे, असा आहे. तर हा ‘नारीवादाचा चष्मा’ लावून आपण लग्न ह्या सामाजिक संस्थेला पारखून बघू शकतो का, असं वाटलं.

लग्न ह्या व्यवस्थेकडे बारीक नजरेने बघण्यापूर्वी मी काही ‘Disclaimers’ मांडते. नारीवादाच्या बोलीत असे म्हटले जाते की कोणतीही संकल्पना किंवा कोणताही निष्कर्ष हा सार्वत्रिक नसून अनुभवजन्य असतो. म्हणूनच, माझे लग्नाबद्दलचे विचार हे माझ्या स्वानुभवातून, माझ्या चालू परिस्थितीतून निर्माण झलेले आहेत. मी एक बावीस वर्षांची, शहरात वाढलेली, इंग्रजीतून शिकलेली, हिंदू ब्राह्मण म्हणून जन्मलेली पण सध्या ह्या ओळखीवर एक मोठा प्रश्न चिन्ह उभा केलेली, अविवाहित पण प्रेमात असलेली, तरुण स्त्री आहे. येत्या २-४ वर्षात लग्न करायचं का, असा किडा सध्या डोक्यात फिरतोय, त्यामधूनच घडलेलं हे विचारमंथन.

ज्या हिंदू, उच्चवर्णीय परंपरेत मी जन्मले, त्यात असं मानलं जातं की लग्न हे एका स्त्रीच्या आयुष्याचे अंतिम व अनिवार्य ध्येय. लग्न झालं म्हणजे आपलं आयुष्य सार्थक होईल; संसाराची सुरुवात झली म्हणजे सर्व काही सुरळीत होईल, अशे संदेश आपल्या समाजातल्या युवांना, आणि विशेषकरून मुलींना, दिले जातात. विशी ओलांडली की आपण जसेकी एका ‘रडार’ खाली येऊन जातो. कौटुंबिक कार्यक्रमात, सामाजिक संमेलनात भेटल्यावर नातेवाईक व ओळखीचे हाच प्रश्न जास्तकरून विचारतात, आता ‘लाडू’ कधी खाऊ घालणार? (मला पहिले पहिले नक्की कोणते लाडू, असा प्रश्न पडायचा!) मुलगा बघायला सुरुवात केली का? अनेक सल्ले सुद्धा मिळतात. मला मध्यंतर असा प्रश्न पडायचा, लोकं असं का विचारात नाही की तू प्रेमात आहेस का? तुझ्या आयुष्यात सध्या ‘priority’ काय आहे? सरळ लग्नावर का येतात?

लग्न ह्या परंपरेला समाजात इतका मोठा दर्जा का आहे, ह्याचा थोडा विचार केला तर लक्षात आलं की लग्न हे समाजाला जसं-की-तसं जपून ठेवण्याचं फक्त एक साधन आहे – जात, धर्म, ई. सारखंच. आपलं नाव, जात, आणि मालमत्ता ही आपल्यानंतर आपल्याच मुलाकडे जावी; समाजात आपल्याकडे असलेली सत्ता हीदेखील आपल्याच कुटुंबात रहावी, ह्याची खात्री होण्याकरिता लग्न. लग्नातून एका स्त्रीच्या लैंगिक्तेवर नियंत्रण ठेवलं जातं, जेणेकरून ती आपल्याच मुलांना जन्म देईल, ही खात्री मिळते. अशी एक म्हण आहे, “मातृत्व हे सत्य आहे, पण पितृत्व हा विश्वास आहे.” हा ‘विश्वास’च पितृसत्तेसाठी असुरक्षित ठरतो, ज्याच्यामधून लग्नाचे बंधन निर्माण झले असावे.

हे बंधन स्त्रियांवर बंधनकारक कसं ठरतं? जास्तकरून हिंदू समाजांमध्ये (काही ईशान्य व दक्षिणेकडच्या मातृवांशिक समाजांना सोडून) लग्न म्हणजे एका स्त्रीला तिच्या जननीय कुटुंबापासून दूर खेचून एका अनोळखी कुटुंबात सोडून देणं. ह्या नवीन व अज्ञात परीस्तीतीत तिच्याकडून तिची संपूर्ण ओळख – प्राथमिकतः तिचं नाव – हडपून घेतली जाते. तिच्यावर विवाहित होण्याचे अनेक छाप लावले जातात, जसे की मंगळसूत्र, सिंदूर, लाल कुंकू, जोडवे, काही ठिकाणी घुंगटही. अर्थात ती आता ‘बंद झलेली तिजोरी’ आहे (हा dialogue आठवणीत आहे का? “अकेली लाडकी एक खुली तिजोरी जैसी होती है.”) हे दर्शवतात. पण ह्याच गोष्टी पुरुषांवर बंधनकारक का नाहीत? त्याचं कारण परत हेच की लग्न हे स्त्री व पुरुष, दोघांसाठी दोन वेगवेगळ्या टोकाचे अनुभव असतात. त्यात ‘समानता’ – जी नारीवादाची प्रथम परिभाषा आहे – ती लाग्नासंस्थेतून गहाळ आहे.

लग्न म्हणजे समाजाने एका स्त्री व पुरुषाला एकाच घरी राहून, लैंगिक संबंध ठेवून, अपत्य उत्पन्न करायला दिलेला मंजुरीचा ठसा. कायद्यातही (विशेषतः ‘Special Marriage Act’) लग्नाची हीच व्ह्याख्या दिली आहे. मला आधी प्रश्न पडायचा की जर दोन लोकांना एकत्र राहून घर चालवायचं असेल, मुलं घडवायची असतील, तर त्याला समाजाची परवानगी का लागते? जर ते दोघे त्यांच्या नात्यात समाधानी असले, तर समाज कोण होतो त्याच्यावर मत व्यक्त करायला? ह्याचे दुसरे टोक असेही आहे की लग्न करून त्या जोडप्याला, विशेषकरून त्यातल्या स्त्रीला, थोडीफार का होईना पण सुरक्षितता मिळते. एक विवाहित स्त्री आपल्या पतीला आपल्या मुलांची जवाबदारी उचलण्याची हक्काने मागणी करू शकते. पण ह्यात असं गृहीत धरलं जातं की एक स्त्री स्वतःची व आपल्या संततीची काळजी एकटी घ्यायला सक्षम नसते. किंवा जरी ती पैश्याने सक्षम असली तरी तिला ‘पती’ नसल्याने तिची परिस्तिथी किती केविलवाणी असेल, अशी एक सामाजिक समजूत असते.

असे का मानले जाते? आणि अश्या मान्यतांमुळेच आपण स्त्रियांकडे बघण्याचा असा दृष्टीकोन तयार करत आहोत का जो स्त्रीची स्वावलंबिता, आत्मसम्मान , व स्व-ओळख रद्द करून तिचं व्यक्तित्व, तिचं अस्तित्व हेच संबंधिक (relational identity) करून टाकतो? मी facebook वर काही दिवसांपूर्वी ही ओळ वाचली जी माझ्या ह्या प्रश्नाला भिडून आहे: “आपल्या मुलीला ‘कोणीतरी’ बनण्याचे स्वप्न दाखवा, ‘कोणाचीतरी’ नव्हे.” (“Teach your daughter to be ‘somebody’, not ‘somebody’s.”)

पण लग्न हे फक्त स्त्री-पुरुषांमधलंच नातं का असलं पाहिजे? सध्याच्या समाजात – ज्याला आपण एक पितृसत्ताक व विषमलिंगी-मानक समाज मानतो – फक्त एका स्त्री आणि पुरुषाला लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी आहे. भारतीय दंड संहितेतसुद्धा कलम ३७७ मध्ये समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवलेलं आहे. पण हे का? असं कोणी सांगितलं आहे की लैंगिक आकर्षण हे फक्त आणि फक्त नर आणि मादी ह्यांच्यामध्येच होतं? जसे काही लोक जन्मजात डावखोर असतात, तसेच काही लोक जन्मजात समलिंगी असतात; ह्या निसर्गतः असलेल्या लैंगिक अभिव्यक्तीला गुन्हा किंवा अनैसर्गिक ठरवणारे आपण कोण? जर आशयच दोन समलिंगी व्यक्तींना आपला जोडीदार शोधून लग्नसंबंधात राहायचं असेल, तर ते नातं एका स्त्री-पुरुष लग्नाइत्कच स्वीकारलं पाहिजे.

मग कोणतं/कशा प्रकारचं लग्न हे समानतेच्या आधारावर अचूक ठरेल? ह्याला खरंतर एकच उत्तर असू शकत नाही. लग्नाच्या निमित्ताने पितृसत्तेने अनेक गुप्त हेतू चालवले आहेत, ज्याच्यामध्ये स्त्रीया व इतर लिंगाधारित अल्पसंख्याक लोकांना दुर्लक्षित केलं जातं व त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. मग लग्न करणं हेच चुकीचं का? मला असं वाटतं, लग्न हे दोन लोकांनी आपल्या नात्याला दिलेली व्याख्या असली पाहिजे. ती त्यांनी स्वतः विचार करून व एकमेकांशी संवाद साधून तयार केली पाहिजे. सामाजिक अपेक्षा व मागण्यांमध्ये न अडकता, उलटं त्याच्यावरच प्रश्न उभे करून, त्यांना चिकित्सक दृष्ट्या पारखून, आपली वेगळी परिभाषा तयार केली, तर ते खऱ्या अर्थाने एक समान व समतावादी लग्न ठरेल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s